मनोरंजन

प्रवीण विठ्ठल तरडे दिग्दर्शित “धर्मवीर – २…आता जगभरात पोहोचणार

Share now

Pooja Samant, Mumbai

येत्या ऑगस्ट महिन्यात बॉक्स ऑफिसवर जोरदार धमाका होणार आहे. कारण अनके दिवसांपासून चित्रपटसृष्टीत आणि प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केलेला “धर्मवीर -२” हा चित्रपट ९ ऑगस्ट रोजी, क्रांती दिनाचे औचित्य साधून प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे, एकाच दिवशी मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये संपूर्ण जगभरात हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर मा.मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, सुप्रसिद्ध अभिनेते बॉबी देओल, सुप्रसिद्ध दिग्दर्शक सचिन पिळगांवकर, महेश कोठारे, महेश मांजरेकर आणि सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ
यांच्या उपस्थित मोठ्या दिमाखात संपन्न झाले.

“धर्मवीर – २” या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि साहील मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेचे मंगेश देसाई,उमेश कुमार बन्सल यांनी केली आहे. कथा,पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन अशी चौफेर भूमिका प्रवीण विठ्ठल तरडे यांनीच निभावली असून महेश लिमये यांनी कॅमेरामन म्हणून काम पाहिले आहे. नोव्हेंबर महिन्यात या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करण्यात आले होते. ‘धर्मवीर… मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटातून स्वर्गीय आनंद दिघे यांचा जीवनप्रवास मांडण्यात आला होता. अभिनेता प्रसाद ओक याने साकारलेली दिघे साहेबांची भूमिका लाजवाब होती. या चित्रपटाला अनेक पुरस्कारांनी देखील गौरवण्यात आले होते.

“धर्मवीर – २” चित्रपटाच्या पोस्टरवर करारी नजर असलेले दिघे साहेब झोपाळ्यावर बसलेले दिसतात.”हिंदुत्त्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही” अशी ओळही नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे आता कमालीची उत्सुकता या पोस्टरमुळे निर्माण झाली आहे.

मराठीसह हा चित्रपट हिंदीतही प्रदर्शित केला जाणार असल्याने “धर्मवीर – २” आता जगभरात पोहोचणार आहे. “धर्मवीर” या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मिळालेला तुफान प्रतिसाद पाहता “धर्मवीर – २” पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धमाका करेल यात काहीच शंका नाही. त्यामुळे आता प्रतीक्षा ९ ऑगस्टची…

Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *