Puja Samantha, Mumbai
“श्यामची आई” हा मराठीतील अद्वितीय चित्रपट. भारत स्वतंत्र झाल्यानंतर पाच वर्षांनी, १९५३ मध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला. स्वतंत्र भारतातला हा पहिला राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट.
साने गुरूजी यांची कथा, आचार्य अत्रे यांचे दिग्दर्शन आणि वसंत देसाई यांच्या संगीताने हा चित्रपट अफाट लोकप्रिय झाला होता.
आचार्य अत्रे यांनी या चित्रपटाला अक्षरश एकहाती पूर्ण केले.
वनमाला बाई आणि माधव वझे यांच्या सहजसुंदर अभिनयाने अजरामर झालेला हा सिनेमा, म्हणजे मराठी भाषिक समाजाचा सांस्कृतिक अभिमान.
हा सिनेमा प्रदर्शित होण्याआधी, १९३३ मध्ये “श्यामची आई” हे आईच्या प्रेमाचे महन्मंगल स्तोत्र प्रसिद्ध झाले होते. त्यातील प्रत्येक शब्दात साने गुरूजींनी आईच्या मायेचे, संस्कारांचे आणि सद्भावाचे गौरवगान केलेले आहे. नाशिक तुरूंगात असताना साने गुरूजींनी या आईच्या कथा लिहिण्यास ९ फेब्रुवारी १९३३ (गुरुवार) रोजी सुरुवात केली आणि अवघ्या चार- पाच दिवसात, १३ फेब्रुवारी १९३३ (सोमवार) पहाटे हे पुस्तक लिहून तयार झाले होते. अनेक भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये अनुवाद झालेले हे पुस्तक म्हणजे “आधुनिक मातृसुक्त” आहे. आचार्य अत्रे यांनी या पुस्तकावर आधारित सिनेमा काढून “श्यामची आई” आणि त्यातील संस्कार घरोघरी पोहचवले. आठ वर्षांपूर्वी “श्यामची आई,” हेच शीर्षक घेऊन याच कथानकावर आधारित सिनेमा येवून गेला. त्यात प्रसाद ओक यांनी साने गुरुजींची भूमिका केली होती. तो सिनेमा फारसा गाजला नाही.
आता नव्याने त्याच नावाचा चित्रपट येतोय.
मी शेअर करीत असलेले, आचार्य अत्रे यांच्या सिध्दहस्त लेखणीतून उतरलेले हे गीत, त्याच चित्रपटातील आहे.
“भरजरी ग पितांबर” हे गाणं म्हणजे सत्शील मराठी मनाचा आत्मस्वर. या गीताला संगीत दिले होते, प्रतिभावंत संगीतकार वसंत देसाई यांनी आणि आवाज साक्षात आशा भोसले यांचा. तेच नाव घेऊन आलेल्या या नवीन सिनेमात हे गीत जुन्याच चालीवर सादर केले आहे. पण त्यावर ना गीतकाराचा उल्लेख, ना संगीतकाराचा. या नव्या सिनेमाशी संबंधित चाळीसेक लोकांची श्रेयनामावली या गाण्यासोबत दिसतेय. पण ज्यांंच्या प्रतिभेने हे गीत , संगीत मराठी समाजाचा, संस्कृतीचा अविभाज्य भाग झाले, त्या आचार्य अत्रे, वसंत देसाई यांना वगळून जर तुम्ही स्वतःची टिमकी वाजवणार असाल, तर मराठी लोक तुमचा चित्रपट का पाहतील…?
अत्रे साहेबांनी वनमाला बाईंच्या रुप-आवाजातील श्यामची आई महाराष्ट्राला दाखवून दिली होती. आज सत्तर वर्षांनंतरही ती आई
लोकांच्या ह्रदयात जिवंत आहे… या पार्श्वभूमीवर तुम्ही त्यांची काॅपी करता, गाणी जशीच्या तशी उचलता आणि साधे श्रेय देणे टाळता हा कृतघ्नपणा आहे. अशाने चित्रपटाला यश मिळेल हा तुमचा गोड गैरसमज आहे. याचा अर्थ तुम्ही मराठी माणसांना ओळखलेले नाही, एवढंच मी म्हणेन.
अजून हा चित्रपट प्रदर्शित व्हायला चार दिवस आहेत,
“चोरी करणे कसे वाईट असते”, हे श्यामला त्याच्या आईने कोणत्या शब्दात सांगितले होते, हे एकदा निर्माता, दिग्दर्शक यांनी पुन्हा वाचावे आणि उगाच कोणी कोर्टात जाण्याची वाट न पहाता,
ज्यांचे श्रेय त्यांना द्यावे ही विनंती…
सुज्ञास अधिक सांगणे नलगे.